वैजापूर, (प्रतिनिधी) : भरधाव वेगाने जाणारा टेम्पो रोडच्या खाली जाऊन पल्टी झाल्याने एक जण ठार तर पाच जण जखमी झाले. हा अपघात शिवूर ते कन्नड रोडवर शिवूर शिवारात गुरुवारी दुपारी घडला. या प्रकरणी शनिवारी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युसुफ उर्फ अयान सिराज शेख (१७) रा. शिवूर असे या घटनेतील मयत मुलाचे नाव आहे.
शिवूर येथून कन्नड येथे कापूस भरण्यासाठी मजूर घेऊन टेम्पो (एमएच २० एजी ११५०)
जात होता. शिवूर शिवारात टेम्पो रस्त्याच्या खाली जाऊन पल्टी झाला. या अपघातात युसुफ शेख मयत झाला तर अक्षय गाडेकर (२५), शहारुख गफुर पठाण (२२), नदीम पठाण (२९), कांतीलाल गाडेकर (६०), गौतम खरात (४५) हे पाच जण जखमी झाले. या प्रकरणी सिराज निजामोद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो चालक कांतीलाल याच्या विरुद्ध शिवूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार किशोर आघाडे हे करीत आहेत.















